Thursday, September 15, 2016



गणेशोत्सव आणि टिळक
लोकांनी एकत्र यावे या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला. त्यांचा हेतू निश्चितच सफल झाला. लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येत आहेत. परंतु एकत्र येऊन लोक नेमकं काय करत आहेत? याचाच मागोवा घेण्यासाठी मी सदरील लेख लिहीत आहे.
लोकांना एकत्र येण्यासाठी, सण साजरा करण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गणेशोत्सव खरंच महत्त्वाचा आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये या उत्सवाने आपले रूपडे पालटले. ‘एक गाव एक गणपती’ सोडा ‘एक गल्ली एक गणपती’ सुद्धा दिसत नाही. एका गल्लीत किमान तीन गणपती असलेच पाहिजेत! बरे, एका गणेश मंडळाचे दुस-या मंडळाशी जमतेच असे नाही. (बहुतांश वेळा गटातटाच्या राजकारणामुळे वेगळा घरोबा करून अगदी शेजारीच दुसरे गणेश मंडळ स्थापन केले जाते.)
अनेकांची वर्गणी (याला खंडणी का म्हणू नये, हा प्रश्नच आहे!) मागण्याची पद्धत सुद्धा विलक्षण असते. झुंडीने लोकांच्या घरी जायचे. त्यांना अमुक इतकी रक्कम द्याच असा आग्रह करायचा. याप्रमाणे गल्लीतील चार-पाच गणेश मंडळांचे भक्त (?) घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करताना दिसतात. व्यावसायिक लोकांना तर व्यवसायाच्या ठिकाणी पुन्हा तीन-चार मंडळांना दक्षिणा द्यावी लागते. बरे द्यायला हरकतही नसावी. पण या रकमेचा विनियोग कसा होतो याचा हिशोब ठेवणारी मंडळे शोधून काढणे हेही एक दिव्य काम ठरावे.
जवळपास सर्व गणेशमंडळांमध्ये चित्रपटाच्या गाण्यांवर ठेका धरल्याचे दिसून येते. (प्रस्तुत लेख लिहित असताना शेजारच्या गणेश मंडळातून ‘झिंग झिंग झिंगाट’ ऐकू येत आहे!) गणेशाच्या मूर्तीसमोर चित्रपटांच्या अश्लील गाण्यांवर नाचणे यात कोणत्या गणेशभक्तीचे प्रदर्शन ही मंडळी करत असतात? ख-या गणेशभक्तांसाठी ही अक्षरशः पैसे देऊन विकत घेतलेली कटकट ठरते.
अर्थात या सगळ्यांना अपवाद ठरणारी काही मंडळे नक्कीच अस्तित्वात आहेत. नम्रपणे वर्गणी मागणारी, चांगले सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारी, सणाचे पावित्र्य अबाधित ठेवणारी, अशी हाताच्या बोटांवर मोजता येतील अशी मोजकी गणेश मंडळे अस्तित्वात आहेतच.
कोजागिरी पौर्णिमा, दहिहंडी, इत्यादी अनेक सणांचे सुद्धा विकृत रूप पाहून किळस येते. भगवान् गणेश या तथाकथित स्वयंघोषित भक्तांना सद्बुद्धी देवोत, हीच प्रार्थना!  
प्राणेश अनंताचार्य काशीकर,
लातूर



5 comments: